मुंबईत होणार निवड चाचणी
जिल्हास्तरीय निवड चाचणीत खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या 20 वर्षा खालील खेळाडूंसाठी होणाऱ्या स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी पार पडली. मुंबई येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी गुलमोहर क्लबचा अरमान शेख व फिरोदीया शिवाजीयन्सचा ओम म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.
भुईकोट किल्ला येथील फुटबॉलच्या मैदानावर निवड चाचणी पार पडली. यामध्ये गुलमोहर फुटबॉल क्लब, बाटा फुटबॉल क्लब व फिरोदीया शिवाजीयन्सच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामधील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या दोन खेळाडूंची निवड मुंबई येथे होणाऱ्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. तर बाटा फुटबॉल क्लबचा खेळाडू हर्षकुमार दास याची राखीव म्हणून निवड झाली आहे. काही कारणास्तव दोन्ही पैकी एखादा खेळाडू राज्याच्या निवड चाचणीला जाण्यास असमर्थ ठरल्यास राखीव खेळाडूला पाठविले जाणार आहे.
जिल्हास्तरावरील निवड चाचणी अहमदनगर फूटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, कार्यकारिणी सदस्य व प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी, राजेंद्र पाटोळे, सहसचिव विक्टर जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी राणाशेठ परमार मैदानावर उपस्थित होते.
मुंबई येथील प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असून, हा संघ 12 मे पासून नारीनपूर, छत्तीसगढ येथे होणाऱ्या स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
