गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष
बाबासाहेब समाज परिवर्तनाचे महानायक ठरले -पै. नाना डोंगरे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नवनाथ विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.
नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाच्या वतीने नवनाथ विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसह जयंती साजरी करण्यात आली. तर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, उद्योजक अरुण फलके, किरण जाधव, लहानबा जाधव, अतुल फलके, लक्ष्मण चौरे, दिपक जाधव, नवनाथ फलके, विठ्ठल महाराज फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मंदाताई डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वंचितांच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करुन समाज परिवर्तनाचे महानायक ठरले. सामाजिक समतेसाठी विषमतेविरोधात तर न्यायासाठी अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला त्यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
