• Mon. Jan 26th, 2026

जिल्हा महिला व बालविकास विभागाचे स्थलांतरित झालेले कार्यालय गैरसोयीचे

ByMirror

Apr 13, 2024

महिला, बालक व दिव्यांगांच्या सोयीसाठी शहराच्या ठिकाणी कार्यालयाची व्यवस्था करण्याची मागणी

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला, बालक व दिव्यांग लाभार्थींच्या सोयीसाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाचे स्थलांतरित झालेले कार्यालय शहराच्या ठिकाणी शासकीय जागेत स्थलांतरित करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शहरापासून लांब असलेल्या नगर-कल्याण रोडवर सदरचे कार्यालय स्थलांतरित झाल्याने महिला, बालक व दिव्यांगांची मोठी गैरसोय होत असल्याने लाभार्थींसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांनी दिला आहे.


जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात सर्जेपुरा येथे होते. त्यामुळे महिला, बालक व दिव्यांग लाभार्थींना तेथे येणे सोयीस्कर होते. परंतु सध्याचे कार्यालय स्थलांतराबाबत घेतलेला निर्णय हा महिला, बालक व दिव्यांग लाभार्थी यांना अतिशय अडचणीचा व खर्चिक आहे. सदर कार्यालयाची जागा ही जिल्हा न्यायालयापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर तर बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथून सुमारे 10 ते 12 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यामुळे महिला, बालक व दिव्यांग लाभार्थी यांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे या लाभार्थींना त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


शहरांमध्ये शासकीय जागा उपलब्ध असताना कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे खाजगी व्यक्तीस भ्रष्ट मार्गाने लाभ मिळवून देण्यासाठी या कार्यालयाचे शहराबाहेर स्थलांतर करण्यात आले असल्याचा आरोप करुन जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय शहराच्या ठिकाणी शासकीय जागेत स्थलांतरित करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *