• Thu. Feb 6th, 2025

शहरात रंगलेल्या बुध्दीबळ स्पर्धेतील पटलावर खेळाचे कौशल्य व रोमांचक लढतीचे प्रदर्शन

ByMirror

Apr 24, 2022

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित

खुल्या बुध्दीबळ स्पर्धेत औरंगाबादचा इंद्रजीत महिंदरकर ठरला चॅम्पियन

अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना अत्यंत क्रीयाशील संघटना असून, खेळाडूंच्या विकासासाठी व बुध्दीबळ खेळाला चालना देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू शार्दुल गागरे यांच्या रूपाने ग्रँडमास्टर घडविण्यात आला आहे. तो जिल्ह्यातील खेळाडूंचे बलस्थान आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. लवकरच शहरात राष्ट्रीय पातळीवर बुध्दीबळ स्पर्धा घेण्याचा निश्‍चय अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या समारोपप्रसंगी फिरोदिया बोलत होते. बडी साजन मंगल कार्यालयात तीन दिवस आंतरराष्ट्रीय मानांकित खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 232 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा समारोप रविवारी (24 एप्रिल) फिरोदिया यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिस वितरणाने झाले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्‍वस्त पारूनाथ ढोकळे, कार्तिक आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे फिरोदिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन वर्षानंतर शहरात पहिल्यांदा खुली बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्वात लहान साडेचार वर्षाच्या खेळाडूपासून ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही सहभाग नोंदवला. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन बुध्दीबळाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात यशवंत बापट म्हणाले की, कोरोना काळात खेळाडूंसाठी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आली. स्पर्धेत कोणत्याही प्रकारे खंड पडू दिला नाही. प्रत्यक्ष पटलावर विविध वयोगटाच्या स्पर्धा घेतल्या. याचा फायदा नगरच्या खेळाडूंना या स्पर्धेत निश्‍चित झाला. नरेंद्र फिरोदिया यांचे बुद्धिबळ खेळाडूंना नेहमीच पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या तीन दिवसात ज्या खेळाडूंचे वाढदिवस त्यांना घरी साजरे करता आले नाही, त्यांचे वाढदिवस स्पर्धेच्या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात आले. कोहिनूरच्या नीता प्रदीप गांधी यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


या स्पर्धेत तीन दिवसात एकूण आठ फेर्‍या झाल्या. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य पणाला लावत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अनेकानेक रोमांचक लढतीने बुध्दीबळ प्रेमींचा उत्साह वाढवला. स्पर्धेत आठ पैकी साडे सात गुण मिळवून औरंगाबादचा इंद्रजीत महिंदरकर खुल्या बुध्दीबळ स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. तर सात गुण मिळवून मुंबईचा गोविंद प्रभू उपविजेता ठरला. तसेच नगरचा शिवप्रसाद काळे व प्रणित कोठारी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत मुख्य पंच प्रवीण ठाकरे व दुसरे पंच अजिंक्य पिंगळे, प्रीती मुंदडा यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, मनीष जसवाणी, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, देवेंद्र वैद्य, संजय खडके, प्रकाश गुजराथी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशनचे प्रायोजकत्व लाभले होते. विजेत्या खेळाडूंना तब्बल 50 हजाराचे रोख बक्षिसे व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी बुद्धिबळ प्रेमी व नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
बिलो 2300 पहिला- इंद्रजीत महिंदरकर (औरंगाबाद), दुसरा-गोविंद प्रभू (मुंबई), तिसरा- प्रणित कोठारी (अहमदनगर), चौथा- अनिश गोडसे (ठाणे), पाचवा- जन्मेश चौहान (मुंबई), बिलो 2000 पहिला- अथर्व मडकर (पुणे), दुसरा- रुपेश भोंगल (मुंबई), तिसरा- चंद्रकांत डोंगरे (पुणे), चौथा- दिपक सुपेकर (अहमदनगर), पाचवा- आदित्य सक्सेना (पुणे), बिलो 1700 पहिला- गड्डा ओम, दुसरा- श्रीपाद जोशी, तिसरा- निखील जोशी, चौथी- आराध्या टिकम, पाचवा- मंथन निमोनकर.

वयोवर्ष 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक- प्रथम- भालचंद्र चांदुरकर, द्वितीय- देविदास नाईक, 9 वर्षा आतील लहान मुले प्रथम- अविरत चौहान, द्वितीय- योगेश काळे, उत्कृष्ट महिला खेळाडू प्रथम- सृष्टी काळे, द्वितीय- तन्वी बोराटे, उत्कृष्ट अहमदनगर खेळाडू प्रथम- सुनिल जोशी, हर्ष घाडगे, उत्कृष्ट अनरेटेड प्रथम- आराध्या केनजल, द्वितीय- अनशुल ननवाणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *