श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता
श्री साई बालाजी प्रतिष्ठानचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री साई बालाजी प्रतिष्ठान मिरजगाव (ता. कर्जत) च्या वतीने बेंगलोर येथील श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ लिविंग आश्रममध्ये राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्वता दृढ करण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र भानुदास गोरे महाराज यांच्या वतीने करण्यात आलेल्या या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
या सप्ताहाचा शुभारंभ आर्ट ऑफ लिविंग आश्रमाचे वैदिक धर्म संस्थानचे प्रमुख स्वामी हरिहरा व स्वामी विश्वरूपा यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले होते. याप्रसंगी महामंडलेश्वर ह.भ.प. काशिकानंद सरस्वती महाराज, भागवताचार्य ह.भ.प. कांतामाई सोनटक्के महाराज, ह.भ.प. दीपालीताई घोडके, युवराज महाराज देशमुख, आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ शिक्षक राजेंद्र राऊत उपस्थित होते.
पहाटे काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, हरिपाठ व हरिकीर्तन असे धार्मिक कार्यक्रम सप्ताहात पार पडले. या सप्ताहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद अनुभूती कार्यक्रम घेण्यात आला. संध्याकाळी श्री श्री रविशंकर यांनी सत्संगाचा भाविकांसह लाभ घेतला. सप्ताहाला महामंडलेश्वर काशीकानंद सरस्वती यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली. ह.भ.प. दीपालीताई घोडके व ह.भ.प. युवराज महाराज देशमुख यांचे किर्तन झाले. झी टॉकीज फेम भागवताचार्य कांतामाई सोनटक्के (जामखेड) यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी श्री श्री रविशंकरजी यांच्या हस्ते दहीहंडी फोडून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने ह.भ.प. राजेंद्र गोरे यांनी ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची पगडी, वारकरी पंचा देऊन श्री श्री रविशंकर यांचा सन्मान केला. याप्रसंगी स्वामी प्रणवानंद यांचाही सन्मान करण्यात आला. सप्ताहामध्ये सर्वांना ध्यानधारांना शिकवण्यात आली.
तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सत्संग व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहासाठी राजू बगाडे, सोनी गुलाटी, लकी गुलाटी, संभाजी खेतमाळस, सुदाम गोरखे गुरुजी, संपतराव बावडकर, बंडूनाना क्षीरसागर, डॉ. दिगंबर पुराणे, राजेंद्र गांगर्डे, बजरंग खोसे, अशोक माने, अरविंद पारखे, रामचंद्र कोल्हे, डॉ. युवराज कांबळे, साहेबराव माने, पप्पूशेठ जपणे, सुरेश झरकर, गणेश तरटे, संदीप बुद्धिवंत, निलेश कुलकर्णी, कांतीवल पुराणे, प्रकाश चेडे, प्रमोद बगाडे, आजिनाथ कोल्हे, मीराताई शेंडे, डिंपूशेठ नंदे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, शंकरशेठ नेवसे, राहुल सोनमाळी यांचे सहकार्य लाभले. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. राजेंद्र गोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष दादासाहेब जवणे, संदीप केदारी, प्रा. राजळे यांनी विशेष योगदान दिले.