• Sun. Jul 20th, 2025

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये

ByMirror

Mar 2, 2024

शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- परीक्षा कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदार यादी व बीएलओ च्या कामासह निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये, याबद्दलचे आदेशात्मक सूचना तात्काळ निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चौकलिंगम यांना निवेदन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा मतदार याद्यांच्या अद्यावती करण्यासाठी तसेच लोकसभा-विधानसभा अन्य निवडणुकांच्या कामाकरिता अधिग्रहीत करण्यात येऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून वारंवार करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत आदेश निर्गमित केले आहे. त्या अनुषंगाने 22 फेब्रुवारी 2024 च्या पत्राद्वारे मुंबई शहर, मुंबई उपनगर क्षेत्राकरिता आदेशात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.


सदर आदेशात्मक सूचना स्पष्ट व नेमक्या स्वरूपाची नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच आदेशात्मक सूचना फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राकरिता मर्यादित असल्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना या आदेशात्मक सूचनेचा लाभ मिळणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

परीक्षा काळात शिक्षकांना कामे दिल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन निघणार नाही. शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या कामासह निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, भगवानआप्पा साळुंखे, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, किरण भावठाणकर, राजकुमार बोनकिले, राजेंद्र सुर्यवंशी, मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे, प्रा. सुनिल पंडीत, शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आदींसह सर्व राज्य कार्यकारीणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *