रक्कमेचे व्याज वसूल करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
1 मार्चला सैनिक बँकेसमोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन निवडून आलेले पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याशी संगनमत करुन पारनेर शाखेतून कोणताही अधिकार नसताना 45 लाख रुपये उचलून रकमेचा अपहार केल्याचा आरोप करुन बँकेतील रक्कमेचे व्याज वसूल करावे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सहकार खात्याकडे व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली असल्याची मागणी विनायक गोस्वामी यांनी केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास 1 मार्चला सैनिक बँकेसमोर बँकेच्या सभासदांसह उपोषण करण्याचा उशारा त्यांनी दिला आहे.
सैनिक बँकेत निवडून आलेल्या पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याशी संगनमत करुन बँकेतील जवळजवळ 45 लाख रुपये पारनेर शाखा या हेड खाते नावे टाकून निवडणुक जिंकण्यासाठी रक्कम वापरली. ही रक्कम वापरत असल्याचे लक्षात येताच, सहकार खात्याकडे तपासणीचा अर्ज केला होता. त्यानुसार अहमदनगर येथील सहकार खात्याचे पथक तपासणी करत आहेत. बँकेत गेली अनेक वर्षे या प्रकारे अनागोंदी कारभार सुरु असून, याचे उत्तर या घोटाळयातून उघड होणार असल्याचे गोस्वामी यांनी निवेदनात म्हंटले आहे.
सैनिक बँकेच्या निवडणुकीत वापरलेले बँकेचे पैश्यांचा व्याज संबंधितांकडून वसूल करावा, कलम 83, 88 व फौजदारी गुन्हा दाखल करावा, कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरणी आरोपी सदाशिव फरांडे याला नवीन संचालक मंडळाने बँकेतून बडतर्फ करावे व कर्जत येथील लेखा परीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन मेजर, विनायक गोस्वामी, संतोष राक्षे, सुरेश दगडू पठारे, देवदत्त साळवे, निलेश तनपुरे, दिपक गायकवाड, अशोक गंधाक्ते, चंद्रकांत पाचारणे, पुरूषोत्तम शहाणे, मेजर सुरेश रासकर, संपत शिरसाठ, सयाजी लगड, ॲड. अशोक भोईटे, ताराचंद करंजुले, दादाभाऊ रणदिवे, विक्रमसिंह कळमकर, सोपान कुलट, वैभव पाचारणे, अशोक दहिवळ प्रयत्नशील आहेत.
बँकेत 17 पैकी 12 नवीन संचालक झाले आहेत. बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या टोळीने बँकेतील 45 लाख रुपये निवडणुकीसाठी वापरले. आमच्यामुळे त्या पैशाची वसूली होणार आहे. मात्र त्या पैश्याचे आता पर्यंतचे होणारे व्याज बुडाले त्याचे काय? यांना पाठशी घातले तर नवीन संचालकावर भविष्यात सदर रकमेची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे सदर पैसे वापरणाऱ्या टोळीवर कारवाई करून बँकेत पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना अपेक्षित असा पारदर्शक कारभाराला सुरवात करावी. चांगल्या कामाला आमचे सर्वांचे सहकार्य राहील. -विनायक गोस्वामी