ज्ञानाने व गुणवत्तेने समाजात संपत्ती, मान, सन्मान मिळतो -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावीपर्यंतचे शिक्षण जीवनाचा पाया असतो. या शिक्षणावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असते. ज्ञानाने व गुणवत्तेने समाजात संपत्ती, मान, सन्मान मिळतो. कोणत्याही क्षेत्रात पारंगत व्हा, प्रत्येक क्षेत्रात वाव व स्पर्धा आहे. त्यासाठी ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगोदर चांगले माणूस व चांगले व्यक्ती म्हणून घडण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले.
दरेवाडी (ता. नगर) येथील मळगंगा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोडखे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले उपस्थित होते.

मुख्याध्यापिका हेमलता मगर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व गुणवत्तेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. बापूसाहेब जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
हरिभाऊ कर्डिले यांनी जीवनात प्रत्येक क्षणाला परीक्षा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे सांगितले. इयत्ता नऊवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील अनुभव व शिक्षकांप्रती आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.