अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- त्या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचे लेखा परीक्षणासाठी नियुक्ती करुन देखील अर्थपूर्ण संबंध ठेवून लेखा परीक्षणाला दिरंगाई करणाऱ्या सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (संगमनेर) यांच्यावर दप्तर दिरंगाई व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त (पुणे) यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (संगमनेर) राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती (कान्हूर पठार, ता. पारनेर) पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. पतसंस्थेने कॅश क्रेडिट कर्ज वाटपाबाबत 24 ऑगस्ट 2023 रोजी चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (संगमनेर) यांना नियुक्त करण्यात आले होते.
परंतु त्यांनी पतसंस्थेतील पदाधिकारी यांच्याशी संगणमत करून जाणीवपूर्वक चाचणी लेखक परीक्षण करण्यास दिरंगाई केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणातील बेजबाबदार सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन यांच्यावर दप्तर दिरंगाई व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.