• Sun. Jul 20th, 2025

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी

ByMirror

Feb 25, 2024

भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार (दि.26 फेब्रुवारी) पासून जिल्हा परिषदे समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


एका प्राथमिक शिक्षिकेने महाराष्ट्र नागरी सेवा लहान मुलांचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार 2 पेक्षा जास्त अपत्य हयात असल्यास त्यांना शासकीय सेवेतून अपात्र करण्यासंदर्भात पुराव्यासह 14 जून 2022 रोजी अर्ज दाखल केलेला आहे. पुरावे म्हणून त्यांच्या मुलांचे जन्माचे दाखले सोबत जोडलेले होते. परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करुन कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे एका प्राथमिक शिक्षकाने खोटे व बनावट कागदपत्र सादर करून आंतरजिल्हा बदली केली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी शोभा पातारे यांनी पुराव्यासह अर्ज दाखल केला. मात्र या प्रकरणातही शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करुन कारवाई केली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


माध्यमिक शिक्षण विभागाच्या (अधिक्षक वर्ग 2) च्या अधिकाऱ्याने शिक्षण व क्रीडा विभागाचे बनावट नियुक्ती आदेश तयार करुन दोनशे लोकांना विविध शैक्षणिक संस्थामध्ये नियुक्त्या दिल्या. या संदर्भात शिक्षण आयुक्त पुणे यांच्या आदेशाने शिक्षण उपसंचालक पुणे यांनी 25 जून रोजी 2022 चौकशी अधिकारी नियुक्ती केलेली असताना त्या अधिकारीशी देखील त्याने तडजोड करुन अद्यापि चौकशी केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तडजोड करुन चौकशी व कारवाई न करणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *