समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकाचा राहणार समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका व सामाजिक न्याय विभागच्या माध्यमातून नगर-मनमाड रोड, कॉटेज कॉर्नर येथे उभारण्यात येत असलेल्या संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन रविवारी (दि.25 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिली.
संत रविदास महाराज विकास केंद्राच्या कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे आदींसह समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहेत.
समाजाचा हा प्रकल्प अनेक दिवसापासून प्रलंबीत होता. त्याला मुर्तस्वरुप येत आहे. एक एकर जागेवर संत रविदास महाराज विकास केंद्र उभे राहत असून, त्याला दिड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 50 लाख रुपयाचा निधी आमदार जगताप यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या केंद्राच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींना दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, संत रविदास महाराजांचे साहित्य व वाचनालयाचा समावेश राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.