उपोषणाचा तिसरा दिवस
अहमदनगर (प्रतिनिधी)- 6 कोटीची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी त्या खाजगी सावकार व बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण केले. गुरुवारी (दि.22 फेब्रुवारी) उपोषणाचा तीसरा दिवस होता. या उपोषणात शिवाजी रिकामे, शकुंतला रिकामे, संदीप रिकामे, दुर्गा रिकामे, शशिकांत गव्हाळे, शुभम गव्हाळे, दीपक पवार आदी सहभागी झाले होते.
एका खाजगी सावकार व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने संगणमत करून 11 शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या संदर्भात सहाय्यक निबंध पारनेर कार्यालयात चौकशी सुरू आहे. चौकशी मध्ये सहाय्यक निबंधक यांनी चौकशी अहवाल 9 जानेवारी रोजी पाठविला आहे. सदर अहवालामध्ये संस्थेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, खाजगी सावकार, संस्थेचे चेअरमन यांनी आर्थिक गैरव्यवहार अफरातफर करून पैशांचा वापर अवैध सावकारीकरिता केल्याबाबत स्पष्ट मत मांडले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याकरिता मत व्यक्त केले असल्याचा दावा उपोषणकर्ते शिवाजी रिकामे यांनी केला आहे.
9 जानेवारी रोजी सहाय्यक निबंध पारनेर यांनी अहवाल सादर करूनही या प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई केली गेली नाही. खाजगी सावकार व त्या पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ संस्थेच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तर सदर खाजगी सावकार व बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर कारवाई होत नाही, तो पर्यन्त उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.