यशासाठी जिद्द, संयम व चिकाटी अंगी असावी -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी नव्या दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने केली पाहिजे. दृष्टी सकारात्मक ठेवा, नकारात्मक वृत्तीचे दुष्परिणाम जीवनात होतात. विद्यार्थ्यांनी जीवनातील ध्येय समोर ठेवावे, अन्यथा ध्येय नसलेली मुले भरकटतात. यशस्वी लोकांमध्ये जिद्द व चिकाटी हे गुण असतात. ताबडतोब यश ही चूकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजत असून, यशासाठी जिद्द, संयम व चिकाटी अंगी असावी लागते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते यांनी केले.

गुलमार रोड येथील आनंद माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्षीय भाषणात विधाते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय संस्थेचे उपाध्यक्ष विलास शेटे, सचिव किसन तरटे, कार्यकारणी सदस्य विश्वनाथ पोखरकर, विश्वनाथ दगडखैर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, राष्ट्रवादी भिंगारचे युवक अध्यक्ष इंजि. शिवम भंडारी आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे प्रा. विधाते म्हणाले की, घरोघरी वृत्तपत्र टाकणारे एपीजे अब्दुल कलाम सारखे व्यक्तिमत्व जिद्द व चिकाटीच्या जोरावर वैज्ञानिक व नंतर देशाचे राष्ट्रपती झाले. चिकाटीने जीवनात यश संपादन करता येते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल आले. मात्र मोबाईलमध्ये अडकलेल्या पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळविणे मोठे कष्टाचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. दहावी, बारावीतील मार्क म्हणजे जीवनातील यश म्हणता येणार नाही, मात्र यशाची पायरी गाठताना शिक्षण देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करुन शाळेने ज्या पध्दतीने घडविले, त्याबद्दल शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी कॉपी मुक्तीची शपथ घेऊन यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला.