सेवानिवृत्तांना सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन
प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी केली जाणार चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (महाराष्ट्र) अहमदनगर शाखेच्या वतीने शहरात जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत एसटी कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी केले आहे.
शुक्रवारी नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकातील अक्षदा हॉलमध्ये सकाळी 10 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. मेळाव्यासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे, कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड, कोषाध्यक्ष गणेश वायफळकर, संयुक्त सचिव पांडुरंग जाधव आदींसह संघटनेचे केंद्रीय सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सेवानिवृत एसटी कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे.
नुकतेच संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने आंदोलन करुन जिल्ह्यातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी 1 कोटी रुपये मिळवून देण्यात आले. हे संघटनेच्या आंदोलन व पाठपुराव्याचे यश आहे. प्रलंबीत प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी या मेळाव्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व सेवानिवृत एसटी कामगारांना सहभागी होण्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.