• Tue. Jul 22nd, 2025

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

ByMirror

Feb 19, 2024

मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मुस्लिम समाजाचा उपक्रम

मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी, ज्युस, कोल्ड्रिंक व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.


या उपक्रमाचे प्रारंभ मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, अजमत इराणी,नविद शेख, जुनेद शेख, अदनान शेख, योगेश बिद्रे, रमीज शेख, समीर शेख, फय्याज शेख, मुनत्झीम पठाण, रफिक रंगरेज, मोहसीन बावा, मुजाहिद पठाण, हुसेन रंगरेज, शाकिर शेख, मोनू निसार शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मन्सूर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये मुस्लिम मावळ्यांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम सरदारांकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचा विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


दरवर्षी मुस्लिम समाजातील युवक पुढाकार घेऊन कापड बाजारात मोठ्या उत्साहात शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत करतात. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून, यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *