• Tue. Jul 22nd, 2025

केडगावात रंगली ज्ञानसाधना गुरुकुलची शिवदिंडी

ByMirror

Feb 19, 2024

चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, सईबाई, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता अशी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. लेझीम पथक व पारंपारिक पद्धतीने सजवलेली बैलगाडी, आकर्षक पध्दतीने शिवरायांची पालखी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.


ज्ञानसाधना गुरुकुल क्लास ते मोहिनीनगर असा दिंडीचा मार्ग होता. यावेळी केडगाव येथील ग्रामस्थांनी मिरवणुकीच्या वेळी ठीक-ठिकाणी छत्रपतींच्या पालखीचे स्वागत केले. साईसेवा मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने शिवरायांच्या पालखीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. मिरवणूक देवी मंदिराजवळ आली असता जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप तसेच केडगाव ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना गुरुकुलने सुरु केलेली शिवदिंडीची संकल्पना कौतुकास्पद आहे. दरवर्षी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून तिचे स्वरूप व्यापक होत चालले आहे. तरुण पिढीने शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. डीजे लावून नाचण्यापेक्षा पुस्तक वाचून शिवरायांचे विचार समजतील. तरुणांनी येणाऱ्या काळात एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवावा, असे त्यांनी सांगितले.


उद्योजक जालिंदर कोतकर म्हणाले की, पारंपारिक पध्दतीने निघालेल्या या मिरवणुक सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. शिक्षणाबरोबर संस्कृती जोपासण्याचे व विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचे कार्य ज्ञानसाधना गुरुकुल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बच्चन कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, अजित कोतकर, सुमित लोंढे, छबुराव कोतकर, कैलास ठुबे, नवनाथ कोतकर, गुलाब कोतकर आदीसह ज्ञानसाधना गुरुकुलचे सर्व शिक्षक, लंडन किड्स शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ढोरसकर, चेमटे, साई सेवा महिला मंडळ, बच्चन कोतकर मित्र मंडळ व अजित कोतकर मित्र मंडळ यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *