बालकलाकारांनी जिंकली मने
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कधी हास्याचे फवारे, कधी टाळ्या तर कधी पालकांच्या डोळ्यात आश्रूही तरळले.

स्नेहसंमेलनास मुख्य अतिथी म्हणून महावितरण कंपनीच्या अहमदनगर मंडळाचे मानव संसाधन व्यवस्थापक रेणुका सुर्यवंशी, शहर उपविभाग-2 चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत, जोतिष्यतज्ञ योगेश मुळे, आहारतज्ञ डॉ. ज्योती येणारे, नगरसेवक विजय पठारे उपस्थित होते.

रेणुका सूर्यवंशी यांनी स्पर्धेच्या युगात बालकांसाठी आवश्यक पोषक आणि सकारात्मक वातावरणाचे महत्व पटवून दिले. भाऊसाहेब कुमावत यांनी माणूस गरीब असो श्रीमंत परंतू शिक्षणामुळेच तो यशस्वी झाल्याचे सांगितले. डॉ. योगेश मुळे यांनी मुलांच्या बालपणीच्या वागण्यावरून त्यांच्या भाविष्याबद्दल भाकीत करू नये, तर त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शनाने यशस्वी व्यक्तिमत्व कसे घडवू शकतो, हे उदाहरणसह सांगितले. डॉ. ज्योती येणारे यांनी चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी सहज आणि सोप्या घरगुती आहाराची महिती दिली. नगरसेवक मोहन पठारे यांनी केडगाव परिसरात दर्जेदार प्री प्रायमरी स्कूलची उभारणी करुन मुलांना संस्कारक्षम शिक्षण दिले जात असल्याचे कौतुक केले.
प्रास्ताविकात बोलतांना फर्स्ट स्टेप स्कूलच्या संचलिका मोनिका भोईटे-कुसळकर यांनी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शाळेवरील प्रेमापोटी पुढील शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करणार असल्याची घोषणा केली. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यकेमाचे सूत्रसंचालन सुलक्षणा अडोळे यांनी केले. आभार वैजयंता कातोरे यांनी मानले.