लुटला बालपणीच्या जीवनाचा आनंद
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल मध्ये आजी-आजोबांचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला. भावी पिढीत संस्कार रुजविणारे आजी-आजोंबाचा हा सोहळा रंगला होता.
प्राचार्या रुचिता जमदाडे म्हणाल्या की, घरामध्ये आजी आजोबांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आजच्या काळात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने विभक्त कुटुंब व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे घरात आजी आजोबा व नातवंडांमधील जिव्हाळा कमी होताना दिसत आहे. तसेच ज्या घरात आजी आजोबा आहेत, परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही. आयुष्यभर ज्यांच्या डोक्यावर कौटुंबिक ओझे होते. त्यांचे स्वतःचे जीवन त्यांना जगता आले नाही. यासर्वांसाठी एक दिवस का होईना, त्यांना मुक्त व स्वच्छंदपणे आनंदित वातावरणात आपले अनमोल क्षण घालवता यावेत व त्यांचा एक दिवस छान जावा या उद्देशाने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नातवंडांनी आजी-आजोबांच्या स्वागतासाठी सुंदर असा डान्स देखील बसवला होता. त्यानंतर प्रत्येक आजी आजोबा यांचे लहान मोठे खेळ घेण्यात आले. यामध्ये मनोरा बनवणे, संख्येचे क्रम लावणे, बॉल पास करणे, गाणे म्हणणे असे विविध खेळाचा आजी-आजोबांनी आनंद घेतला. काही आजी आजोबांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले. या कार्यक्रमामुळे आम्हाला आमचे बालपण जगता आले अशी बोलकी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात मुलांसोबत आमच्या देखील सहलीचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, सपना साबळे, कल्याणी शिंदे, प्रतिभा साबळे आदी शिक्षकांसह गायकवाड व साबळे मावशींनी परिश्रम घेतले.