वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने तरुणाई भारावली
युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना व्हिलचेअरचे वाटप; युवकांचा उत्स्फूर्तपणे रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने युवक-युवतींमध्ये आई-वडिलांविषयी कृतज्ञाची जाणीव करण्याच्या उद्देशाने भावनिक व्याखान पार पडले. यामध्ये युवा व्याख्याते वसंत हंकारे यांनी बाप समजून घेताना या विषयावर तरुणाईचे प्रबोधन केले. तर जीवनात आई-बापाचा त्यागाचे स्मरण करुन देताना उपस्थित युवक-युवती अक्षरश: अश्रू ढाळू लागल्या तर काहींनी आई-वडिलांना मिठी मारली.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमात फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू दिव्यांग बांधवांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. तर झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

प्रास्ताविकात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे काम सुरु आहे. मात्र सध्याची तरुणाईची करियर घडविण्याच्या वयात दिशा भरकटत आहे. आई-वडिलांची काळजी न करता प्रेमापोटी मुले-मुली पळून जावून स्वत:चे आयुष्य उध्वस्त करत आहे. त्यांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपाध्यक्ष संदेश कानडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

व्याख्यानात वसंत हंकारे यांनी आई-बापाचे महात्म्य सांगताना सर्वांना गहिवरून टाकले. ते म्हणाले की, मुलांनो आई बाबांवर प्रेम करा, त्यांचा विश्वास संपादन करा, त्यांची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या. एकावेळी अभ्यासात मागे राहिले तरी चालेल किंवा नापास झाले तरी चालेल, पण आयुष्यात कोणतेच असे काम करू नका की ज्याने आई बापाला खाली मान घालून समाजात वावरावे लागेल. मान खाली घालून समाजात वावरणारा बाप जिवंतपणीच रोज मरत असतो. पोरांनो जीवनात चांगले काम करायला शिका. आईबाप हेच खरे मंदिर आहे त्यांची सेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर समाजात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, वैज्ञानिक घडले नाही तरी चालेल, मात्र चारित्र्यवान माणूस घडला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. हंकारे यांनी श्रोत्यांना व्याख्यानातून अक्षरशः खिळवून ठेवले. सर्व सभागृह भावुक झाले होते.

आमदार संग्राम जगताप यांनी आजच्या युवकांना दिशा देण्याची गरज आहे. एक पाऊल जरी चुकीचे पडले तर संपूर्ण आयुष्य बर्बाद होते. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. यासाठी युवकांनी जागृक होण्याचे त्यांनी सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात आलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. समाजात अनेक चुकीच्या घटना घडत असताना, मुली-मुलींच्या चूकीच्या निर्णयाने आई-वडिलांना त्रास होतो. मुलांनी आई-वडिलांची जाणीव ठेऊन समाजात वावरण्याचे स्पष्ट केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष ओंकार पागावाड, खजिनदार महेश साठे, मार्गदर्शक चंद्रकांत काळोखे, नितीन साठे, प्रदीप वाघचौरे, संस्थेचे सदस्य राज जाधव, सुमित भिंगारदिवे, प्रिया धायतडक, किरण पालवे, प्रिती क्षेत्रे, प्रशांत कनगरे, यश शेकटकर, प्रतेश मोहिते, टेरी वाघमारे, हर्षल शिरसाठ, श्रेया कसबेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापाड यांनी केले. आभार फाऊंडेशनचे सचिव साईराज चव्हाण यांनी मानले