सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी केली धमाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचलित लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर नृत्याविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जागृती केली. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ठेका धरुन एकच धमाल केली. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली.
सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिरुद्ध अडसूळ, सौ. अडसूळ, रामराव चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे, एसडीए करियर इन्स्टिट्यूट (पुणे) चे संचालक मेडिटेशन व कौन्सिलर अमित पुरोहित, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन खिळे, प्राचार्य मोहिनी खिळे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्या मोहिनी खिळे यांनी शाळेला पाच वर्ष झाले असून, भौतिक सुविधा निर्माण करून देताना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा कटिबद्ध आहे. पुढील वर्षापासून प्राथमिकचे वर्ग देखील सुरु केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय अर्जुन खिळे यांनी करुन दिला. मधुरा खिळे यांनी अहवाल वाचन करुन शाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर केला.
अमित पुरोहित म्हणाले की, जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया आहे. या शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते व माणूस जीवनात उभा राहतो. पालकांनी देखील विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट विद्यार्थीचा पुरस्कार कु. ओवी शेळके हिला देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कुलकर्णी यांनी केले. आभार शिल्पी तिवारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी बरगे, ज्योती खैरनार, छाया कुत्तरवडे यांनी परिश्रम घेतले.