सचिवपदी सोनल श्रीराम तर खजिनदारपदी सुनंदा गंजी यांची निवड
पदग्रहण सोहळ्यात महिला पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्याचा संकल्प
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत लिनेस कल्ब ऑफ अहमदनगर राजमाता ही महिलांनी महिलांसाठी सामाजिक कार्यासाठी सुरु केलेल्या संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात शोभा भालसिंग यांनी अध्यक्षपदाची तर सोनल श्रीराम यांनी सचिवपदाची व सुनंदा गंजी यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्विकारली.
सावेडी येथे झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून लिनेस क्लबच्या प्रांताध्यक्षा लतिका पवार, माजी प्रांताध्याक्षा छाया रजपूत, विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव उपस्थित होत्या. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शोभा भालसिंग म्हणाल्या की, समाजातील विविध प्रश्न विशेषत: महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी लिनेस क्लबचा पुढाकार राहणार आहे. शहरातील महिलांना क्लबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे. लिनेस क्लब करणार आहे महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही सामाजिक चळवळ असून, आगामी वर्षभरामध्ये महिला सबलीकरण, महिलांना उद्योजक बनविण्यासाठी विविध उपक्रम, महिलांचा सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांना दिशा देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लिनेस क्लब गेल्या तीस वर्षापासून शहरात कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्षा व माजी प्रांताध्यक्ष स्व. राजश्री मांढरे व माजी प्रांताध्यक्षा स्व. अश्विनी भंडारे यांच्या प्रेरणेने लिनेस क्लब अहमदनगर राजमाता कार्यरत आहे. लिनेस क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गरजू निराधारांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, मतदार जागृती अभियान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण विविध महापुरुषांची जयंती उत्सव असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
सुरुवातीपासूनच लिनेस क्लब प्रांतामध्ये अग्रेसर पद्धतीने कार्यरत असल्याची माहिती सचिव सोनल श्रीराम यांनी दिली.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी एकमताने निवड करण्यात आली. तसेच क्लबच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी मीनाक्षी जाधव, सविता जोशी, सहसचिवपदी आशा कांबळे, सहखजिनदारपदी ज्योती कानडे, जनसंपर्क अधिकारीपदी अजिता एडके, संचालकपदी शांता ठुबे, शारदा होशिंग, हिरा नळे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.