राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी
जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास न देता, अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब ढवळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यांवर कारवाई न करता खाद्यपदार्थांच्या हातगाडीवरती देशी, विदेशी मद्य सेवन करणाऱ्यांना त्रास देऊन हातगाडी चालकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.
खाद्यपदार्थांच्या हातगाडीवरती ग्राहक येऊन देशी, विदेशी दारू सेवन करत असतात. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देण्याचे हेतूने तुमच्याकडे व्यवसाय परवाना आहे का? असे विचारुन कारवाई करत आहे. पोटाच्या उदरनिर्वाहासाठी अनेकांकडे व्यवसाय करण्याचा परवाना नसतो. अशा खाद्यपदार्थ विकणारे हातगाडी व्यावसायिक या गाडीवर आपला कुटुंब चालवत आहे. खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक दारु विकत नाही.
अवैध हातभट्टी दारुचे अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे. या अवैध हातभट्टी दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, काही मरण देखील पावले आहेत. काहींच्या आशीर्वादामुळे अवैध हातभट्टी दारु विक्री सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास न देता, अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करण्याची मागणी ढवळे यांनी केली आहे. अन्यथा शहरातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर गावठी दारूचा स्टॉल लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.