वाचा कौशल्या चित्र वाचन स्पर्धेत राज्यातील विद्यार्थी तर शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याच्या स्पर्धेत शिक्षकांचा सहभाग
कर्णबधीर मुलांमध्ये जाणीव निर्माण करणारे शिक्षकांची भूमिका कौतुकास्पद -अरविंद पारगावकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अपंग कल्याणकारी मंडळ संचलित जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालयात कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी वाचा कौशल्या चित्र वाचन आणि कर्णबधीर शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याची राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडली. कै. डॉ. कलाताई जोशी यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून 24 शाळांनी तर 45 शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ एल ॲण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, सचिव डॉ. ओजस जोशी, खजिनदार राजस जोशी उपस्थित होते.

अरविंद पारगावकर म्हणाले की, विज्ञान युगाने माणसे जवळ आणली आहेत, परंतु कर्णबधीरांशी संवाद महत्त्वाचा आहे. या मुलांमध्ये जाणीव निर्माण करणारे शिक्षकांची भूमिका कौतुकास्पद आहे. मुलांनी जिद्द अंगीकारून स्पर्धेत यश मिळवावे. अपयश आल्यास ही यशाची पहिली पायरी समजून नियमित सराव करावा. जीवनात यशस्वी होण्याचा हाच मूलमंत्र असून, नेहमी आशावादी राहणे आणि प्रेरणादायी जीवन जगणे हा यशस्वीतेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
राधाकिसन देवढे म्हणाले की, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाचा सहभाग गरजेचा आहे. चांगल्या व्यक्तींनी आपण समाजाचे देणे लागतो ही भावना अंगीकारून दुर्बल व्यक्तीस मदत करत राहणे आवश्यक आहे. दिव्यांगांना मदत करताना सहानुभूती वाटू नये, अशा प्रकारे आपला सहभाग असावा. लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणे व दिव्यांग दुर्बल घटकांना जगणे सुसह्य करणे सर्वांचे कर्तव्य आहे. दिव्यांगांसाठी राज्यस्तरावर घेण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. ओजस जोशी डॉ. शंतनू सौंदनकर हे उपस्थित होते. या स्पर्धेत यश प्राप्त करणारे विद्यार्थी व शिक्षकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी संस्थेची माहिती दिली.
डॉ. विद्या जोशी यांनी या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत कर्णबधीर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांना कलागुणांना संधी निर्माण करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. ओजस जोशी यांनी मुलांच्या विकासाकरिता स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दिवस भरातील कार्यक्रम तुळशीराम जाधव यांनी साईन लॅग्वेजद्वारे विद्यार्थ्यांना सांगितला. या कार्यक्रमास संस्था सदस्य रश्मीताई पांडव, अरोरा आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले. आभार शिवानंद भांगरे व सहदेव कर्पे यांनी मानले.
वाचा कौशल्य व चित्र वाचन स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे नऊ ते बारा वयोगटात विजेते- माधुरी वाळके (वि.रा रूईया मूकबधिर विद्यालय, पुणे), विटकर तन्मय सागर (अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे), दिपाली दामोदर तिवारी (मूकबधिर विद्यालय सावेडी अहमदनगर), माही संदीप जाधव (रोटरी मूकबधिर इचलकरंजी), 12 ते 17 वयोगटातील विजेते- कार्तिक संतोष गायकवाड (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय), तनिषा प्रवीण गोंडाळ (बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे), शशिकांत चंद्रकांत गो (मूक बधिर निवासी शाळा कुर्डूवाडी), पुनम अंबादास गवळी (कस्तुरबा मूकबधिर विद्यालय सोलापूर), अनुजा जाधव (वी.रा. रुईया मूक बधिर विद्यालय पुणे), निमिष प्रदीप मेर (शापरिया कर्णबधिर विद्यालय पालघर), कु.गौरी निशिकांत कन्हेरे (मूक बधिर विद्यालय कुर्डूवाडी), यश जितेंद्र काळे (हडपसर कर्ण बधिर विद्यालय, पुणे), तसेच कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या चित्रवाचन स्पर्धेत 9 ते 12 वयोगटातील विजेते- भक्ती संदीप जाधव (साई श्रद्धा मूकबधिर विद्यालय, शिर्डी), समर्थ पवार (मूक बधिर विद्यालय, नेकनूर), आदित्य राठोड (सोजर मूक बधिर विद्यालय भूम), रोहन लक्ष्मण पवार (निवासी मूकबधिर विद्यालय, उमरगा), 12 ते 15 वयोगटातील विजेते- गोविंदा अविनाश जाधव (मूक बधिर विद्यालय, विटा), युवराज वाघ (उत्कर्ष कर्णबधिर विद्यालय, छत्रपती संभाजी नगर), स्नेहल मोहळे (निवासी मूकबधिर विद्यालय उमरगा), अफवान शेख प्रतीक (सेवाभावी मूक बधिर विद्यालय, पालघर), 15 ते 18 वयोगटातील विजेते- मिताली राजेंद्र धुत (जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, अहमदनगर), रामकृष्ण फावडे (निवासी मूक बधिर विद्यालय, उमरगा), श्रावणी जाधव मूक बधिर विद्यालय, विटा), जयप्रकाश धुडक नाळे (मूक बधिर विद्यालय, हडपसर, पुणे) या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ अशा पध्दतीने 1001, 701, 301 रोख रक्कम व प्रमाणपत्र पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
शिक्षकांच्या शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम- पूजा मेथारे (बधीर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे), द्वितीय- मनीषा गुंजाळ (रोटरीची कर्णबधिर मुलांची शाळा, पनवेल), तृतीय- रमेश भालेराव (आयर्मंगलंम मूक बधिर विद्यालय, बीड) यांना अनुक्रमे 9999, 7777, 5555 अशी रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.