सह्याद्री छावा संघटनेची मागणी
जिल्हा परिषदेत एकाच अधिकारीकडे असलेले महत्त्वाचे व अनेक संवेदनशील विभागांचा पदभार काढावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अत्यंत महत्त्वाचे व अनेक संवेदनशील विभागांचा पदभार ताब्यात असणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचे पदभार काढून जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी व्हावी व यामधील दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
जिल्हा परिषदेतील एकाच अधिकारीने जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा व लघुपाटबंधारेचे अतिरिक्त कारभार स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. एकाच अधिकारीकडे एवढे महत्त्वाचे विभाग कोणत्या कारणांनी देण्यात आले. कलेक्शन करण्यासाठी या अधिकाऱ्याची खास नेमणूक करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्याने कॉन्ट्रॅक्ट ही मर्जीतील ठेकेदारांना खिरापत प्रमाणे वाटले असून, अनेक ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असून, नियमबाह्य पध्दतीने व आदेशाचे भंग करून कामकाज सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
त्या अधिकाऱ्याने मुंबईमध्ये तळ ठोकून एका नेत्याच्या मर्जीतील अधिकाराचा गैरवापर करून प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारीची बदली करून त्या जागी हा अधिकारी आलेला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे सर्वांना त्रास होत असून, जलसंधारण विभागातील मलिदा सर्वांना पोच करण्याचे काम तो करत आहे. त्याच्याकडे तीन विभागाचे महत्त्वाची जबाबदारी ही वसुलीसाठी आहे. या अधिकाऱ्याची पत्नी बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना लाचखोरीच्या प्रकरणात अडकली असून, तिला अटक देखील झाली आहे. या अधिकारी दांम्पत्यांच्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
प्रामाणिक अधिकाऱ्यास हटवून तीन विभागाचा कार्यभार स्वतःकडे घेणाऱ्या अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार तात्काळ काढून घ्यावा, जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सदर अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा परिषद समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.