तर राहत्या घराची मोजणी करु देत नसल्याचा आरोप; न्याय मिळण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन हडपल्याची तक्रार माजी सैनिक हरिभाऊ गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे केली आहे. तर थोरला भाऊ राहत असलेल्या घराची मोजणी करु न देता, दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करुन न्याय मिळण्याची मागणी माजी सैनिकाने केली आहे.
पळवे खुर्द (ता. पारनेर) येथील हरिभाऊ गाडीलकर हे भारतीय हवाई दलात कार्यरत होते. ते सन 1981 मध्ये सेवानिवृत्त झाले. सात वर्षांपूर्वी तिन्ही भाऊ शेती वाटप करून वेगळे राहू लागले. 70 वर्षे उलटल्यावर विभक्त होऊन जमीन वाटप करण्याचे ठरवल्यावर थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन स्वत:च्या नावावर केल्याचा उलगडा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विभक्त होत असताना जमीन समसमान वाटप करण्याची जबाबदारी थोरला भाऊ आनंदा गाडीलकर याने घेतली, मात्र अनेक वर्षापूर्वीच त्याने गट क्रमांक 418 स्वतःचे नावे करून घेतला होता. तर या जागेत वाटा न देता 7-12 वर त्याने नाव लावून घेतले आहे. भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता 1989 मध्ये त्याने ही जागा स्वत:च्या नावे करुन घेतली असल्याचे उघडकीस आले.
मी व धाकटे बंधू नोकरीनिमित्त बाहेर असल्याने या गोष्टीचा फायदा घेऊन इतर सर्व शेतात त्याने आमचे नाव दाखल केले, परंतु गट क्रमांक 418 स्वतःच्याच नावे करुन घेतला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. वडीलोपार्जित जमिनीपासून वंचित ठेवत गट क्रमांक 349 मध्ये राहत्या घराची मोजणी तो करू देत नसल्याने याप्रकरणी न्याय मिळण्याची मागणी माजी सैनिक हरिभाऊ गाडीलकर यांनी केली आहे.