राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या आंदोलनाला यश
निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा
अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी 1 कोटी रुपये एसटी महामंडळाने वर्ग केले असून, जिल्ह्यातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या खात्यात पैसे वर्ग झाले आहेत. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेल्या आंदोलनास यश आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळात नसल्याने संघटनेच्या वतीने सर्जेपूरा, रामवाडी येथील एसटीच्या विभागीय कार्यालया समोर सोमवारी (दि.29 जानेवारी) आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या खात्यात पैसे वर्ग केले आहे. तर रजेचे मेडिकल बील (2016 ते 2020) ची थकबाकी देण्याची तयारी दर्शविली असून, परत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु असून, सर्व सभासदांचे पाठबळ मिळाल्यास एकजुटीने सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. तर एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन त्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार माणण्यात आले आहे.