स्वराज्य कामगार संघटनेने कामगारांसह घेतली सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट
एक्साइड कंपनीतील संतप्त कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी कामगारांना कायम सेवेत न घेता त्यांना थेट कामावरुन काढून टाकले जात असल्याप्रकरणी स्वराज्य कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांची भेट घेऊन कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे, अध्यक्ष दत्ता तापकिरे, सुनिल कदम आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसी मधील एक्साइड कंपनीचे व्यवस्थापन व सुपरवायझर संगनमताने कंपनीतील कंत्राटी कामगारांना त्रास देण्याच्या उद्देशाने प्रत्येक वेळी काम करत असताना डिपार्टमेंट बदलले जात आहे. तर त्यांना जाणीवपूर्वक त्रास देवून कामावरून काढून टाकण्यात येत आहे. नियमाप्रमाणे कालावधी पूर्ण झालेल्या कामगारांना कायम करणे आवश्यक असताना अशा कामगारांना कामावरुन कमी करुन नवीन कामगारांची भरती केली जात आहे. यामुळे जुन्या कामगारांचा रोजगार हिसकावण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे सर्व कंत्राटी कामगार वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांनी 5 फेब्रुवारी रोजी कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले. तर या बैठकीत तोडगा न निघाल्यास एक्साइड इंडस्ट्रीज मधील सर्व कामगार 11 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.