पारनेर तालुक्यात विविध कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात विविध विकास कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट काम व गैरकारभाराची चौकशी करुन सबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर मंगळवारी (दि.30 जानेवारी) उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात वारंवार मागणी करुन देखील दखल घेतली जात नसल्याने ठोस कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर पातुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी म्हंटले आहे.
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरेगाव, काळकुप, माळकुप येथील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले ले असून, ते काम शासन परिपत्रकानुसार झालेले नाही. त्याचप्रमाणे मौजे जांबुत व वारणवाडी येथील जलजीवन मिशनचे कामही प्लॅन इस्टिमेटप्रमाणे न होता, अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
माणिकदौंडी येथील गुरुदेव दत्त माध्यमिक विद्यालय शाळेतील शिकाऊ शिक्षकाचे वैयक्तिक मान्यता चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्याबाबतही अद्यापि चौकशी झालेली नाही व त्याचा अहवाल देखील प्राप्त झालेला नाही. श्रीगोंदा येथील शिरसगाव बोडखा येथे 2020 ते 2023 मध्ये झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असताना त्याची देखील चौकशी करण्यात आलेली नाही. पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी कामात अनियमितता केल्याने चौकशी अहवाल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला प्राप्त होवूनही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदरील जलजीवन मिशनचे निकृष्ट काम व अनागोंदी प्रकरणी तातडीने चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फ करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून निकृष्ट कामाचे कोणतेही बील अदा करु नये, पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंत्रालयात मुख्य सचिवांना देण्यात आले आहे.