श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या छायाचित्रांचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने दिल्लीगेट येथे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी झालेल्यांचे छायाचित्र असलेले फलक लावून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या अनोख्या फलकाची शहरात चर्चा रंगली आहे.
या फलकावर अयोध्या मंदिराशी निगडीत साधुसंत, सीलबंद राम मंदिराचे कुलुप उघडणारे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, राम मंदिरासाठी रथ यात्रा काढणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, प्रविण तोगडिया, मुरलीमनोहर जोशी, विष्णू हरी डालमिया, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, कारसेवा दरम्यान आक्रमक भाषणे करुन वातावरण निर्मिती करणाऱ्या उमा भारती, साध्वी ऋतंबरा, विजयाराजे सिंधिया, बाबरीच्या घुमटावर भगवा झेंडा फडकवणारे आणि पोलीसांच्या गोळीबारात मरण पावलेले कोठारी बंधू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या तुकडीत सहभागी असणारे मोरेश्वर सावे, मधुकर सरपोतदार, सतिश प्रधान तसेच उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील तत्कालीन शिवसेनेचे नेते जय भगवान गोयल, पवन पांडे, संतोष दुबे आणि बाबरीच्या घुमटावर चढुन बाबरी पाडणारे शिवसैनिकच होते हे ज्यांच्या मुळे सिध्द झाले ते सांगलीचे शिवसैनिक सुरेश शेळके, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व खात्याच्या वतीने वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामात उत्खनन व सर्वेक्षण करून त्या ठिकाणी मंदिरच होते हे पुराव्यानिशी सिद्ध करणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद, तसेच जय भगवान गोयल, सुभाष देशमुख, संतोष दुबे आदींचे छायाचित्राचा या फलकावर समावेश असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दिलदार सिंग (बीर) यांनी म्हंटले आहे. या सर्वांचेच रामजन्मभूमी मुक्ती करण्यापासून ते श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान असून, त्यांच्या कार्याला बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने सलाम करण्यात आले आहे.
