बीसीएफआय एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम
धार्मिक शिक्षणाबरोबरच महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी शिबिराचे आयोजन -हजरत मोहसीन अली
अहमदनगर (प्रतिनिधी)- गोविंदपूरा येथील बीसीएफआय एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक हजरत सय्यद मोहसीन अली शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
हजरत सय्यद मोहसीन अली शाह म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणाबरोबरच महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागते. वेळीच आजाराचे निदान झाल्यास गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आलेमा फलक इनामदार म्हणाल्या की, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. बदलती जीवनशैली व चुकीची आहार पध्दतीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांना आरोग्याप्रती जागृक करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात डॉ. फातिमा सय्यद व डॉ. योगिता दरेकर यांनी महिलांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सदृढ आरोग्यावर मार्गदर्शन केले. या शिबिरात शंभरपेक्षा जास्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात महिलांची थायरॉईड, रक्तातील साखर, कॅल्शियम, हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात आल्या.