गरजूंवर होणार अल्पदरात शस्त्रक्रिया
आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल -रतिलालजी कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेत कटारिया परिवार खारीचा वाटा उचलत आहे. सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटलने मोठा विश्वास संपादन केला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले असल्याचे प्रतिपादन रतिलालजी कटारिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कटारिया (खरवंडीवाला) परिवाराच्या वतीने आयोजित जनरल सर्जरी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रतिलालजी कटारिया बोलत होते. श्रीमती बदामबाई असराजजी कटारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी महावीर कटारिया, सुशीला कटारिया, राखी कटारिया, आदर्श कटारिया, विनोद बलदोटा, रिखब पारख, कुंताबाई चोरडिया, मंगलताई धाडीवाल, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रकाश छल्लाणी म्हणाले की, आनंदऋषीजींचे रुग्णसेवेचे स्वप्न हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. या सेवा कार्यात कटारिया परिवार सातत्याने योगदान देत आहे. या रुग्णसेवेच्या महायज्ञात अनेकांचे हातभार लागून सर्वसामान्यांची रुग्णसेवा घडत आहे. एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा देऊन सर्व व्याधी दूर करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राखी कटारिया म्हणाल्या की, घरातूनच सामाजिक कार्याचा वसा वडिलांकडून मिळाला असून, ती प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात योगदान सुरु आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. या आरोग्य मंदिरात सेवा करण्याची संधी मिळाली असून,या निष्काम सेवा कार्यात नेहमीच कटारिया परिवाराचे योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भास्कर जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स, इंगवायनल हार्निया, हायड्रोसिल, मुळव्याध आदींवर अद्यावत उपचार पध्दती, सोयी-सुविधा व सवलतीची माहिती दिली.
या शिबिरात जनरल सर्जन डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर व डॉ. भास्कर जाधव यांनी 105 रुग्णांची मोफत तपासणी केली. तर गरजूंवर अपेंडिक्स, इगवायनल हर्निया, हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार डॉ. वसंत कटारिया यांनी मानले. 30 जानेवारी रोजी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात फिजिओथेरपी शिबिर होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.