भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
सोमवार पासून कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागा विकत देण्यास नकार दिल्याने जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सोमवार (दि.22 जानेवारी) पासून कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

रघुनाथ आंबेडकर यांची पत्नी शांताबाई आंबेडकर यांचे भाळवणी येथे राहत असलेल्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे चप्पलचे दुकान आहे. घरा शेजारी राहणारे व मुंबई येथे मत्स्य व्यावसाय करणाऱ्या व्यक्तीने सदर जागा विकत मागितली होती. परंतु आंबेडकर दांम्पत्यांनी सदर जागा विकण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्यांनी काही जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांना हाताशी धरुन जातीवाचक शिवीगाळ करुन सदरची चप्पलची दुकान जेसीबीद्वारे पाडण्यात आली. पारनेर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करुन देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नसून, याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर मत्स्य व्यावसायिक मुंबईला बसून सर्व सूत्र हलवित असून, मागासवर्गीय कुटुंबातील महिलेचे दुकान जेसीबीद्वारे पाडण्यात आले. सदर व्यक्तींमुळे कुटुंबीयांमध्ये दहशत पसरली असताना सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला तो मत्स्य व्यावसायिक व त्याच्या सांगण्यावरुन दुकान पाडणारे गुंडांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा व गुंडांपासून संरक्षणाच्या दृष्टीकोनाने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
