काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती
युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार -प्रशांत ओगले
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार आहे. सत्ताधारी पक्षांमुळे युवकांची वाताहात झाली असून, हाताला काम नाही व श्रमाला योग्य मोबदला मिळत नसल्याची शोकांतिका आहे. हुकुमशाही पध्दतीने सर्वच क्षेत्रातील प्रश्न गंभीर बनत चालले असताना युवकांना पुढाकार घेऊन परिवर्तन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी केले.
युवक काँग्रेसमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे यांच्यासह आशिष घोरपडे, ऋषिकेश थोरात आदी युवकांनी प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिम शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, अज्जू शेख, सागर इरमल, राजू शेख, प्रवीण गीते, अमित लोखंडे, तन्वीर शेख, आकाश लोखंडे, आशिष घोरपडे, ऋषिकेश थोरात आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिम शेख म्हणाले की, सर्व बहुजन समाजातील युवकांनी एकजुट करुन शहरात काँग्रेसची ताकत वाढविण्याचे कार्य सुरु आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व समाजातील युवकांना राजकारणात संधी दिली जात आहे. युवकांनी पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढीचे कार्य सुरु करण्याचे त्यांनी आवाहन केले.
