रिपाई महिला आघाडीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा
9 मीटरचा रस्ता अडवून उभारले रो हाऊसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील प्रगती नगर येथे शासकीय जागेतील 9 मीटरचा रस्ता अडवून अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात रिपाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई फ्रान्सिस पवार व स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयास तक्रार देऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील प्रगती नगर येथे एका बांधकाम व्यावसायिकाने दादागिरी करुन शासनाने लेआउट मध्ये दिलेला 9 मीटरच्या रस्त्यावर बांधकाम केले आहे. रो हाऊसिंगच्या सदर बांधकामामुळे स्थानिक नागरिकांना रहदारीसाठी असलेला रस्ता बंद झाला आहे. रस्त्याची हद्द न पाहता आरसीसी बांधकाम करुन सदरचे अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्या बांधकाम व्यावसायिकाने शासनाच्या ले आऊट प्रमाणे बांधकाम करणे आवश्यक होते. परंतु नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्याचा विचार न करता सदरचे बांधकाम करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. रस्त्याचे मोजमाप करुन रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले पक्के बांधकाम पाडण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 24 जानेवारी पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
