राजमाता जिजाऊंवर सादर केलेल्या प्रेरक भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथील मातृतीर्थावर झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तर काळे यांनी या जयंती उत्सवात राजमाता जिजाऊंवर सादर केलेल्या प्रेरक भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मशाली पेटवून जिजाऊंना मानवंदना दिली. या सोहळ्यात जय जिजाऊ… जय शिवराय… चा जयघोष दुमदुमला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मराठा समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, सुनिल महाजन, मयुराताई देशमुख, निर्मलाताई पाटील, अर्चनाताई ठोसर, प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अनिता काळे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ यांनी शिवबांवर संस्कार करून स्वराज्याची निर्मिती केली हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी देखील आपल्या मुलांवर संस्कार करावेत म्हणजे पुन्हा स्वराज्य निर्माण करता येईल. तरुण पिढीला मार्ग दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र घराघरात पोहोचवणे महत्त्वाचे आहे. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन उद्याचा महाराष्ट्र घडवायचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील अनिता काळे यांचे महिला सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
