रक्तदान शिबिरात युवक-युवतींचा प्रतिसाद
महागाईच्या काळात मोफत आरोग्य शिबिर समाजाची गरज -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवात बचत गटातील महिला व कार्यक्रमास भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवक-युवतींचा प्रतिसाद लाभला. सावित्री ज्योती महोत्सवात पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शनाचे उत्कृष्ट सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत माहेर फाउंडेशन, नर्मदा फाउंडेशन, आधारवड बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, जीवन आधार प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे, रजनीताई ताठे, ॲड. सुनील तोडकर, ॲड. अनिता दिघे, पोपट बनकर, ॲड. पुष्पा जेजुरकर, सुभाष जेजुरकर, पूनम ताठे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ॲड. महेश शिंदे, भैय्या गंधे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, धनंजय खेडकर, जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. महागाईच्या काळात मोफत आरोग्य शिबिर समाजाची गरज बनली आहे. सर्वसामान्यांना इच्छा असताना देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचण येते. अशा शिबिराचा आधार मिळाल्यास समाज निरोगी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधराणी हॉस्पिटल (पुणे), अहमदनगर जिल्हा रुग्णालय, मनपाचे आरोग्य केंद्र, बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी, संपूर्ण सुरक्षा केंद्र आदींच्या माध्यमातून डॉ. प्रमोद पालवे, डॉ. संतोष गिऱ्हे, सागर फुलारी, संतोष काळे आदी विविध वैद्यकीय तज्ञांनी बचत गटातील महिलांची व महोत्सवला भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत रक्ताच्या तपासण्या, स्त्रीरोग आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, हाडांची तपासणी केली.
सावित्री ज्योती महोत्सवास भेट देणाऱ्यांसाठी दररोज सोडत सोडून भाग्यवान विजेत्यांना सेमी पैठणीचे बक्षीस दिले जात आहे. झालेल्या सोडतमध्ये राजूरच्या (ता. अकोले) मीनाताई म्हसे या भाग्यवान विजेत्या महिलेला सेमी पैठणीचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जयेश शिंदे, तनीज शेख, कल्याणी गाडळकर, आरती शिंदे, स्वाती बनकर, जयश्री शिंदे आदींनी परिश्रम घेतले.