• Tue. Jul 22nd, 2025

अहमदनगर जिल्हा टी.डी.एफ. ची वाटचाल हुकूमशाहीकडे -बाजीराव कोरडे

ByMirror

Jan 12, 2024

23 वर्षानंतर बंद खोलीतून जिल्हा कार्यकारणी जाहीर केल्याचा आरोप

टी.डी.एफ. सभासदा मधून निवडीचा तीव्र निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा टी.डी.एफ. ची वाताहात लाऊन संघटनेची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु असल्याची भावना टी.डी.एफ. चे खजिनदार बाजीराव कोरडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकारामुळे माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष चांगदेव कडू, एम.एस. लगड, शंकराव जोरवेकर, शिवाजीराव हरिचंद्र, रामनाथ सुरवशे, दिलीप फलके, हरिश्‍चंद्र नलगे, विठ्ठलराव गायकवाड, ज्ञानदेव नालकर, बाळासाहेब भोर, विठ्ठलराव पानसरे, लताताई डांगे, दिलीप शेणकर, अच्युतराव जगदाळे यांच्यासह सक्रिय सभासद व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असल्याचे कोरडे यांनी म्हंटले आहे.


23 वर्षानंतर शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) ची नगर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती करताना जिल्ह्यातील एकाही टी.डी.एफ. कार्यकर्त्याला कार्यकारिणी निवडीसाठी बोलवण्यात आले नाही. सर्वसाधारण सभेचा अजेंडा नाही, हिशोब नाही, नवीन कार्यकारिणी निवडणुकीत तारीख, वेळ व स्थळ कोठेही प्रसिद्धी नाही आणि अचानक अहमदनगर जिल्हा टी.डी.एफ. ची कार्यकारणी एका बंद खोलीत तयार करून जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप कोरडे यांनी केला आहे.


या नुतन कार्यकारणीची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली असून, टी.डी.एफ.ची पंचसूत्री तसेच टीडीएफचा विचार व घटनेवर बोलणाऱ्यांना अशी घरात बसून केलेली कार्यकारणी कशी पटली? असा सवाल जिल्ह्यातील शिक्षक करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


ही कार्यकारणी होण्या अगोदर नगर येथे सुमारे दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमध्ये बैठक पार पडली. त्या बैठकीत सदस्य पदाधिकारी यांनी लोकशाही मार्गाने तालुका कार्यकारणी करण्यात येईल व नंतर जिल्हा कार्यकारणी निवडण्यात येईल, असे ठरले होते. परंतु जिल्ह्यातील एकही पदाधिकारी तसेच सभासद यांना माहिती न देताच सोशल मीडियावर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. टी.डी.एफ.ला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आश्‍चर्य वाटले. 23 वर्षात जर दर दोन वर्षांनी कार्यकारणीची निवड झाली असती, तर आत्तापर्यंत टी.डी.एफ.चे दोन हजार कार्यकर्ते चळवळीत तयार झाले असते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांत तीव्र असंतोष पसरला आहे.


सध्या अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. जुनी पेन्शन योजना, शालार्थ आयडी, शालाबाह्य कामे, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्‍न असे अनेक प्रकारचे प्रश्‍न शिक्षकांसमोर आहेत. परंतु अशा प्रकारे हुकूमशाही पद्धतीने संघटना तयार केल्याने शिक्षक लोकशाही आघाडीतील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काही मोजक्या लोकांनी केलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सर्व टी.डी.एफ. सभासदा मधून या निवडीचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असल्याचेही कोरडे यांनी म्हंटले आहे.
या सर्व बाबी वरिष्ठ पातळीवर कळविण्यात येणार आहे. जर श्रेष्ठींनी सभासदांच्या भावनेची दखल घेतली नाही तर पुढील विचार टी.डी.एफ.च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना करावा लागणार असल्याचा इशारा कोरडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *