• Tue. Jul 22nd, 2025

चिचोंडी पाटीलच्या त्या माहिती अधिकार कार्यकर्त्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

ByMirror

Jan 11, 2024

सरपंचासह पिडीत कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली भेट

शेत जमीन, जागा व इतर प्रॉपर्टी बळकाविण्यासाठी ग्रामस्थां विरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीन, जागा व इतर प्रॉपर्टी बळकाविण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यांक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करुन व खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पिडीत कुटुंबीय व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.


तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव पुढे करुन ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला. यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, चंद्रकांत पवार, किरण मोरे, ज्ञानेश्‍वर हजारे, दौलावडगावचे लहानू पवार, बाबासाहेब जेजुरकर, पीडित कुटुंबिय कौसाबाई सरोदे, विठ्ठल सरोदे, सूर्यभान सरोदे, रख्माबाई सरोदे, अंजना कोळी, माधुरी कोळी, राजू कोळी, संजय कोळी, अक्षय कोळी, युवराज हजारे, पोपट हजारे, अंबादास फिस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


चिचोंडी पाटील येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भद्रे यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायत मिळकतीवर वडील व चुलत्याच्या नावे जागा करुन घेतली. तर रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे तेथील नागरिकांचा रस्ता रहदारीसाठी बंद झालेला आहे.


कौसाबाई सरोदे, सूर्यभान सरोदे व विठ्ठल सरोदे या धनगर समाज बांधवांच्या मालकीच्या सातबारा उताऱ्यावर हेराफेरी करून 8 गुंठेचे खरेदीखत घेऊन 23 गुंठे नोंद केली. तर कोरोनाच्या काळात त्यांचे घर पाडून त्यावर दगडी व तारेचे कंपाउंड करून उर्वरित 6 एकर जमीनीवर बेकायदेशीर ताबा मारला आहे. सरोदे यांनी विकलेल्या 20 गुंठे जमीनीचे 10 लाख रुपये न देता खरेदी घेतली व त्याचा ताबा देखील घेतला. तिघे बहिण-भाऊ भद्रे त्यांच्याकडे गेले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी तो देत आहे.


अंबादास धोंडीबा फिसके यांच्या शेतातील पोल तोडून भद्रे यांनी अतिक्रमण केले. तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून त्यांनी बेकादेशीर ग्रामसभेचा ठराव करून, शेताचा बांध कोरुन, पोल कंपाऊंड तोडून रस्ता करून सदरचे अतिक्रमण केलेले आहे. तर आदिवासी समाजातील अंजना कोळी यांची जामखेड रस्त्यालगत असलेली जागा, राहते घर व नाश्‍ता सेंटरवर डोळा ठेऊन भद्रे त्यांच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देत आहे. माळी समाजातील युवराज हजारे या व्यक्तीने देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत भद्रे यांच्या विरोधात पोलीसात तक्रार केली आहे. जमीन हडपण्यासाठी ते कुटुंबीयांमध्ये फूट पाडून वाद लावत आहे. हजारे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता देखील बंद करुन पाईपलाईन तोडणे, मशागतीस अडथळा निर्माण करणे, चोरीचा आरोप करणे, खोट्या बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न तो करत आहे. तर शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली जात असल्याची पिडीत ग्रामस्थांची तक्रार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


पिडीत कुटुंबीयांची जागा बळकाविण्याच्या उद्देशाने त्यांना विविध प्रकारे त्रास देऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर भद्रे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार पिडीत कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.



जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्या व्यक्तीने अनेक ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. जागा बळविण्याच्या उद्देशाने पिडीत कुटुंबियांविरोधात अर्ज, तक्रारी करुन त्यांच्यावर दहशत निर्माण करत आहे. काही जागांवर त्याने ताबे मारले असून, सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरणाऱ्या या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने कारवाई करुन त्याचा पर्दाफाश करावा व सर्वसामन्य ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा. -शरद पवार (सरपंच, चिचोंडी पाटील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *