विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल, युवकांसाठी विविध स्पर्धा व बचट गटांच्या विविध स्टॉलचा समावेश
लोककला, ब्युटी टॅलेंट शो, कवीसंमेलन रंगणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी व विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचे गुरुवार (दि.11 जानेवारी) पासून प्रारंभ होत आहे. 11 ते 14 जानेवारी पर्यंत सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात जय युवा ॲकेडमी, महिला आर्थीक विकास महामंडळ, अहमदनगर महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रिडा कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जिल्हा परिषद, कासा संस्था, समाजकार्य महाविद्यालय, समाजकल्याण विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य, रयत प्रतिष्ठान, जिल्हा रूग्णालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहर बार असोसिएशन, मनपा आरोग्य विभाग संपूर्ण सुरक्षा केंद्र आदींच्या सहयोगाने सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे, पोपटराव बनकर यांनी दिली.
गुरुवारी (दि.11 जानेवारी) सकाळी 10 वाजता सर्व धर्मिय वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विवाहाच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशातून या मेळाच्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, मुलीच्या जन्माचे स्वागत याबाबत जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात 4 वाजता बचतगट उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडाळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे आदींच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुहासराव सोनवणे यांचा सेवापूर्तीचा सोहळा होणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सोनवणे यांचा स्नेहगौरव सेवापूर्ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे.
समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे गणेश महाराज आंबेकर, सीए शंकर अंदानी, एल ॲण्ड टी चे दिलीप आढाव, युवा उद्योजक विनोद साळवे, ह.भ.प. सुनिल महाराज तोडकर, बँक व्यवस्थापिका विद्या तन्वर, प्राचार्या ज्योत्सना शिंदे, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, इजि. परिमल निकम, मुस्ताक बाबा, चंद्रकांत ठोंबे, भाऊसाहेब ठोंबे, प्रा. सुनिल मतकर, आरपीआयचे नेते विजय वाघचौरे, धर्मराज रासकर, भाऊसाहेब माशेरे, डॉ. अनिल सलाणे, डॉ सविता सलाणे, संतोष शिंदे, संगीता शिंदे, अशोक सुर्यवंशी, सुनंदा सुर्यवंशी, बाळासाहेब वाघमारे, द्वारका वाघमारे, संदीप दरेकर, मंगल दरेकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानानित करण्यात येणार आहे.
शुक्रवारी (दि.12 जानेवारी) राष्ट्रीय युवाा सप्ताह व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोफत कायदेविषयक व्याख्यान, समुह नृत्य स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मेहंदी, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला विधीज्ञांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.13 जानेवारी) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजने मार्फत रयत प्रतिष्ठान, नर्मदा फाऊंडेशन आदींच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, रक्ताच्या विविध तपासण्या, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, दंत तपासणी, हिमोग्लोबिन, महिलांची आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी, आयुर्वेद, होमिओपॅथी उपचार, निसर्गोपचार आजारांबाबत मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. दुपारच्या सत्रात प्रगती फाऊंडेशन संचलित बटरफ्लाय नर्सरी शाळेचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच अहिल्या मेकओव्हर, उडाण फाऊंडेशन, न्यु डेलिकेट ब्युटी पार्लर ॲण्ड स्टुडिओ आदींच्या माध्यमातून ब्युटी टॅलेट शो चे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.14 जानेवारी) लोप पावत चाललेल्या लोककला जतन करण्याच्या उद्देशाने लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात बक्षीस वितरण, बचतगट स्टॉल धारकांचा गौरव, हळदी-कुंकू, शहर बार असोसिएशनच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे.
या संमेलनास दररोज भेट देणाऱ्या महिलांना लकी ड्रॉ कुपनाद्वारे सेमी पैठणी साठीचे बक्षीस दिले जाणार आहे. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना कापडी पिशव्या दिल्या जाणार आहेत. मनपा आरोग्य विभाग अंतर्गत सोनग्राफी व समाजकल्याण विभागाच्या वतीने व्यसनमुक्तीची जनजागृती केली जाणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडाळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, ॲड. अनिता दिघे, दिनेश शिंदे, आरती शिंदे, तनिज शेख परिश्रम घेत आहे.
