अर्बन बँकेतील महिला ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कारवाईची केली मागणी
अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठ महिलांची ठेवी परत मिळण्यासाठी आर्तहाक
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी महिला ठेवीदारांसह जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. अनेक महिला ठेवीचे पैसे अडकल्याने अडचणीत सापडल्या असताना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कारवाई करुन घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर अर्बन बँकेचे प्रशासक गायकवाड यांची देखील भेट घेऊन महिलांना त्यांच्या ठेवी लवकर मिळण्याबाबत निश्चित कालावधी देऊन आश्वासित करण्याचे स्पष्ट केले.

अहमदनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल गुन्हे दाखल होऊन अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. परंतू अद्यापि कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. बँकेतील ठेवीदारांमध्ये महिलांची संख्या मोठी असून, हजारो महिलांची आयुष्यभराची पुंजी बँकेच्या गैरव्यवहारामुळे अडकली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त नागरिक, शेतकरी, विधवा, कष्टकरी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचे अतोनात हाल होत आहेत. आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, अडीअडचणीसाठी लागणारे त्यांच्या हक्काचे पैसे बँकेत अडकल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी कॅन्सरग्रस्त असलेल्या एका महिला ठेवीदाराला उपचारासाठी पैसे नसून, त्यांची बँकेत अडकलेली 25 लाखाची ठेव परत मिळत नसल्याने जगणे अवघड झाल्याचे सांगून त्यांचे डोळे पाणावले. तर घोटाळे करणारे आरामात असून, ज्येष्ठ महिला ठेवीदार बँकेकडे खेट्या मारत आहे. बँक कधी पैसे परत करणार याची शाश्वती देत नाही. घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा काळ सोकावेल, अशी बोलकी प्रतिक्रिया महिला ठेवीदारांनी दिली. अर्बन बँक घोटाळ्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रमाणे लवकरात लवकर चौकशी करून आरोपींना शासन झाले पाहिजे. महिला ठेविदारांना प्राधान्य क्रमाने ठेवी परत मिळण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने रुपवते यांनी केली. यावेळी मिरा शिंदे, प्रतिक्षा जव्हेरी, शकुंतला लोहकरे, मिरा देहाडराय, ताराबाई काकड, तारा देहाडराय, बबई वाळके आदी महिला ठेवीदार उपस्थित होत्या.
अर्बन बँक घोटाळ्यात पैसे अडकलेल्या महिला ठेवीदारांची परवड होत आहे. हजारो महिलांचे कष्टाचे कोट्यावधी रुपये अडकले आहे. ते पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसत नसल्याने महिलांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. मुला-मुलींचे लग्न, औषधोपचार, मुलांचे शिक्षण हे प्रश्न गंभीर बनले असून, संपूर्ण हयात घालवून कष्टाने कमावलेली जीवनाची पुंजी बँकेत अडकली आहे. महिलांना लवकरात लवकर ठेवी परत मिळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवून महिलांना न्याय मिळावा. -उत्कर्षा रूपवते (सदस्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग)