सर्व सार्वत्रिक निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी
जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि.5 जानेवारी) ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (इम्पा) जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार, संजय शिंदे, युसुफ शेख, त्रिंबक नेटके, सुरेश गायकवाड, योगी महाराज, नवनाथ गायकवाड, वासुदेव राक्षे, अमिनभाई इनामदार, पोपट आरु, माधव देठे, पावलस भिंगारदिवे, विनोद साळवे, दत्ता वामन, रमेश गायकवाड, ज्ञानदेव झिंजुर्डे, रवींद्र कांबळे, अंबादास आरोळे, तनीज शेख, सदाशिव निकम, श्रीधर शेलार आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील 567 जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम विरोधात राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन, 14 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर 31 जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सुभाष आल्हाट यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपीएटी मशीन जोडून दोन्ही मतांची शंभर टक्के तलुना करण्याचे सूचित केले होते. परंतु काँग्रेसचे अभिषेक सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपीएटी मशीनचे शंभर टक्के जुळण्याऐवजी 50 टक्के जुळवण्याचे प्रकरण आणले. यामध्ये ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपीएटी मशीनचे चिठ्ठया 1 टक्के जुळविण्याचा निर्णय देण्यात आला. निवडणुकीत केवळ 1टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ईव्हीएम मशीन वरील जनतेचा विश्वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीन वर अविश्वास दाखवलेला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्या संबंधित पंधरा ते वीस हजार तक्रारीचे प्रकरण भारतीय निवडणुक आयोगाच्या पोर्टलवर नोंद आहेत. निवडणूक आयोगाने अद्यापि अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही दिलेली नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात असंवेदनशीलता दाखवत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पारदर्शी व लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना दिले. सदर प्रश्नी दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.