राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचे एक लाख बक्षीस पटकविण्याची संधी
माझा भारत विकसित भारत 2047 विषयावर युवक-युवती मांडणार विचार
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने बुधवारी (दि.10 जानेवारी) जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार असून, राज्यस्तरावर विजेत्यास 1 लाख रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा नगर-औरंगाबाद रोड येथील भीमा गौतमी वस्तीगृह येथे बुधवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. भाषण स्पर्धेसाठी माझा भारत विकसित भारत 2047 चा विषय देण्यात आला असून, 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांना भाषण मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत करता येणार आहे. भाषणासाठी प्रत्येक स्पर्धकाला 7 मिनिटे वेळ देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या स्पर्धकाला राज्य पातळीवर पाठवले जाणार असून, तेथे प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय 50 हजार व तृतीय क्रमांक 25 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण यांनी दिली.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून, अर्जाबरोबर आधार कार्डची प्रत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे 9579616484, वैभव लोखंडे 9604487695 व रमेश गाडगे 9850711389 यांच्याशी संपर्क करण्याचे सांगण्यात आले आहे.