फुलेवाडा समताभूमीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
फुले दांम्पत्यांनी मुलींची पहिली शाळा सुरु करुन समाजात परिवर्तनाची बीजे रोवली -गणेश बनकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा (जि. पुणे) येथे मुलींची पहिली शाळा सुरु केल्याच्या सन्मानार्थ माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या भिडेवाडा ते फुलेवाडा महारॅलीत अहमदनगर जिल्ह्यातील माळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पुणे, गंजपेठ येथील फुलेवाडा समताभूमीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. यावेळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, सांस्कृतिक आघाडी पारनेर तालुकाध्यक्ष तथा युवा व्याख्याते ह.भ.प. विकास महाराज रासकर, मार्गदर्शक संतोष विधाते आदी उपस्थित होते.

गणेश बनकर म्हणाले की, 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु करुन समाजात परिवर्तनाची बीजे रोवली. बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली. हा दिवस माळी महासंघ आणि सकल फुले प्रेमी जनतेच्या वतीने समता सन्मान दिन म्हणून साजरा करत आहे. महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष आविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी भिडेवाडा ते फुलेवाडा महारॅलीचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या महारॅलीत विविध सामाजिक संघटना, सकल फुलेप्रेमी सहभागी झाले होते. जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषाने परिसर दणाणून निघाला होता.