मागील चार वर्षापासून समाजात योग-प्राणायामाचा प्रचार-प्रसाराचे कार्य
आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे -डॉ. प्रसाद उबाळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा करण्यात आला. मागील चार वर्षापासून आनंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रचार-प्रसार सुरु असून, नागरिकांसाठी निशुल्क योगाचे वर्ग घेऊन समाजात आरोग्याप्रती जागृतीचे कार्य केले जात आहे.
सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात झालेल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त 150 साधकांच्या उपस्थितीत झालेल्या योग शिबिरात स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याप्रती जागृक राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेदतज्ञ डॉ. प्रसाद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे डॉ.प्रा. श्याम शिंदे, डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे, केंद्र प्रमुख दिलीप कटारिया, सोनाली जाधववार, उषा पवार, प्रतीक्षा गीते, पूजा ठमके, स्वाती वाळुंजकर, मनिषा गायकवाड, राजेंद्र चौधरी, राजेंद्र कलापुरे, बाळू गांधी, प्रमोद भारूळे, सुरेश चव्हाण, प्रमोद बिहाणी आदी उपस्थित होते.

आयुर्वेद तज्ञ डॉ. प्रसाद उबाळे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावात वावरत आहे. तर प्रत्येक मनुष्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत ताणतणाव असतातच, हे कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. पण त्याची तीव्रता कमी करता येते, त्यासाठी योगा, प्राणायाम व ध्यान यांचा उपयोग होतो. परंतु जोपर्यंत आपण आपली विचार करायची पध्दत आणि भावना व्यक्त करायची पद्धत बदलत नाही, तो पर्यंत मानसिक ताणतणाव नियंत्रणात राहू शकत नाहीत. मानसिक ताणतणाव हे शारीरिक व्याधी निर्माण करत असतात, त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे आहे. त्याबरोबरच संतुलित व सकस आहार सेवन करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आयुर्वेदातील सिद्धांत स्पष्ट करुन, प्रत्येकाने वय व परिस्थितीनुसार स्वतः विचार करण्याची व भावना व्यक्त करण्याची पद्धत बदलली तर वैयक्तिक व कौटुंबिक वातावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक वातावरण पण चांगले राहणार असल्याचेही उबाळे यांनी सांगितले.
दिलीप कटारिया म्हणाले की, योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येते. योगाभ्यास नियमितपणे केला पाहिजे. समाज निरोगी करण्यासाठी आनंद योग केंद्रात जास्तीत-जास्त योग शिक्षक तयार करण्याचे कार्य सुरु आहे. घराघरात योग पोहचविण्यासाठी हे आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून शुभ मंगल कार्यालयात सकाळी विविध योग वर्गांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रशेखर सप्तर्षी यांनी आभार मानले.