जानेवारीच्या शेवटी भुयारी मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू करण्याची हमी
तर भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, भुयारी मार्गाचे प्रलंबीत काम मार्गी लावावे व इतर विविध मागण्यांसाठी उपसरपंच प्रा. दिपक जाधव यांनी ग्रामस्थांसह सुरु केलेले उपोषण चौथ्या दिवशी रविवारी (दि.31 डिसेंबर) दुपारी नगर तहसिलदार व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सदस्य दीपक दरे, तहसीलदार विक्रम पवार, संजय शिंदे, रमेश काळे यांनी प्रा. दीपक जाधव यांना सरबत पाजून उपोषण सोडवले. यावेळी तलाठी भाऊसाहेब लोंढे, ग्रामसेवक साळवे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे देशमुख, मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चव्हाण, मनीषा कन्स्ट्रक्शनचे खांदवे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, माजी सरपंच अब्दुल खान, सुभाष खजिनदार, माजी सरपंच भानुदास भगत, भाऊसाहेब रा. काळे, माजी पंचायत समिती सदस्य व्ही.डी काळे, अरुण लांडगे, मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे, उपाध्यक्ष रमेश पाटील काळे, माजी चेअरमन उत्तम काळे, यशवंत काळे, शिवाजी लांडगे, रोहिदास जाधव, विजय लांडगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबासाहेब गायकवाड, माजी तहसीलदार तुकाराम डावरे, भाऊसाहेब लांडगे, भाऊसाहेब काळे, सरपंच नंदाताई भगत, मेघनाथ धनवटे, अजित काळे, अनिल लांडगे, योगेश पिंपळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन 1995 मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. परंतु आज 25 वर्षे उलटून देखील संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. देहरे येथीलउड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करण्यात आले. त्यानंतर संबंधित कंपनीने नगर कोपरगाव रस्त्याचे काम घेतले. त्यावेळी देहरे भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रस्त्या खालून भुयारी मार्गाचे संबंधित कंपनीने आश्वासन देऊनही काम पूर्ण झालेले नाही. देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन 1995 मध्ये भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा व ग्रामस्थांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम त्वरीत सुरु करण्याची मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केले होते.
नगर तहसीलदार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता, भूसंपादनाच्या अनुषंगाने मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद यांच्या कार्यालयात स्वतः जाऊन आवश्यक ती सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्रात स्पष्ट केले आहे. तर देहरे भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत राष्ट्रीय राज्य महामार्ग विकास महामंडळाचे ठेकेदार मनीषा कन्स्ट्रक्शन यांचे प्रतिनिधी यांच्याशी तहसीलदार यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता, 30 जानेवारी पर्यंत सदर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच संबंधित कन्स्ट्रक्शनला पत्राद्वारे आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे लेखी पत्रात म्हंटले आहे.
तसेच मनीषा कन्स्ट्रक्शनने देखील उर्वरित भुयारी मार्ग हा मिळालेल्या निविदामध्ये समाविष्ट असून, सदर भुयारी मार्गाचे आराखडे व नकाशे यांचे काम अंतिम टप्प्यात असून, भुयारी मार्ग बनवण्यासाठी लागणारे वळणाचे काम येत्या दोन दिवसात सुरू करीत असल्याचे व त्यानंतर जानेवारीच्या शेवटी प्रत्यक्षात काम सुरू करणार असल्याचे लेखी दिले आहे. या लेखी आश्वासनाने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.