सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याला हातभार
आनंदऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्याने प्रभावित झालो -अनिल लुणिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये निस्वार्थ व सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक अनिल लुणिया व परिवाराच्या वतीने हॉस्पिटलला अद्यावत डायलिसिस व व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आली. अनिल लुणिया व रशिला लुणिया दांम्पत्यांच्या हस्ते या मशीनचा लोकार्पण करण्यात आला. याप्रसंगी लायन्स क्लब रॉयलचे अध्यक्ष सुमित सोनी, शांताबाई सुराणा (मनमाड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
लायन्स क्लब रॉयल व लायन्स इलिटच्या माध्यमातून लुणिया यांनी त्यांची पत्नी रशिला लुणिया व मुलगा डॉ. वंश लुणिया यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेसाठी डायलिसिस व व्हेंटिलेटर मशीनची हॉस्पिटलला मदत केली. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, उद्योजक अनिल लुणिया यांनी मोठे समाजकार्य उभे केले आहे. कोट्यावधी रुपयांचे दान करुन समाजासाठी सातत्याने त्यांचे सेवाभावाने कार्य सुरु आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेच्या यज्ञात योगदानाची आहुती दिली असून, त्यांची सद्भावना प्रेरणादायी आहे. त्यांचे रक्तदान, नेत्रदान, देहदान व अवयवदान चळवळीत सुरु असलेले कार्य स्फूर्ती देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलेसिस सेंटर व देशभरात नावाजलेले कार्डियाक सेंटरची त्यांनी माहिती देऊन या हॉस्पिटल मधील अद्यावत मशनरी रुग्णांचे आयुर्मान वाढवण्यास मदत करत असून, सर्व सामान्यांना उच्च दर्जाची रुग्णसेवा दिली जात असल्याचे स्पष्ट केले.

अनिल लुणिया म्हणाले की, आनंदऋषीजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाली केली. त्यांच्या प्रेरणेने समाजात सेवाभावाने कार्य सुरू आहे. आनंदऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्याने प्रभावित झालो व क्षणाचाही विलंब न करता ही मदत देऊ केली. या मदतीमधून मानव सेवेच्या कार्यात हातभार लागला आहे. या हॉस्पिटलच्या सर्व टिमच्या कार्याला सलाम असून, अंतिम क्षणापर्यंत सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी रक्तदान, नेत्रदान, देहदान व अवयवदान चळवळीची माहिती दिली.
शांताबाई सुराणा म्हणाल्या की, बंधू असलेले अनिल लुणिया यांनी प्रवाह विरोधात जाऊन सामाजिक कार्य उभे केले आहे. गरजूंसाठी देवदूताची भूमिका ते पार पाडत आहे. दिनदुबळ्यांना आधार देऊन गरिबांची सेवा घडवून त्यांची मनुष्यरुपी ईश्वर सेवा सुरु असल्याचे ते म्हणाल्या.
सुमित सोनी म्हणाले की, घरातून बाहेर पडताना ते दिवस मावळेपर्यंत अनिल लुणिया यांचे सेवा कार्य सुरू असते. परगावी जाताना लोक इतर सोयी-सुविधांचा विचार करून बाहेर पडतात. मात्र लुणिया नगरमध्ये येताना गाडीत ब्लँकेट भरुन रस्त्यावर दिसणाऱ्या गरजू व ऊस तोड कामगारांना वाटत आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उद्योजक पेमराज बोथरा, मनिषा बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, समीक्षा गौरव बोथरा, सतीश लोढा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, अभय गुगळे, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.