पगारवाढीच्या करारावर तोडगा निघाल्याने कामगारांमध्ये उत्साह
अहमदनगर (प्रतिनिधी)- पगारवाढीच्या नवीन करारासाठी लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेले उपोषण तडजोडीनंतर चौथ्या दिवशी सुटले. शुक्रवारी (दि.29 डिसेंबर) सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे ट्रस्टचे विश्वस्त व युनियनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पगारवाढीवर झालेल्या सुनावणीत तीन वर्षासाठी 3600 रुपयाची पगारवाढ (प्रत्येक वर्षी 1200 रुपयाची वाढ), मुळ रकमेत 60 टक्के तर 40 टक्के महागाई भत्ता कामगारांना देण्याचा या बैठकीत निर्णय झाला. तर मागील 9 महिन्याचे फरक कामगारांना देण्याचे ट्रस्टने मान्य केले आहे. या निर्णयाचे स्वागत करुन कामगारांनी उपोषण मागे घेतले.
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली होती. कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे पगारवाढीच्या नवीन करारावर सुरु असलेल्या सुनावणीत सात ते आठ तारखा होऊन देखील तोडगा निघत नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने मंगळवार (दि.26 डिसेंबर) पासून वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.

ट्रस्टने 3 टक्क्यांची देऊ केलेली पगारवाढ युनियनने धुडकावली होती. तर मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची मागणी कामगारांनी केली होती. यावर शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सदरचा तोडगा काढण्यात आला. अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांनी उपोषण स्थळी जाऊन कामगारांचे उपोषण सोडवले. यावेळी कामगार अधिकारी बोरसे, अंबादास केदार, ट्रस्टचे विश्वस्त फेमरोज मिस्त्री, रमेश जंगले, मेहेरनाथ कलचुरी, राजू प्रसाद, योहान नोबल, लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, अरणगावचे सरपंच पोपट पुंड, ग्रामपंचायत सदस्य नर्मदा कांबळे, उपसरपंच पप्पू दळवी, दिलीप कांबळे, अनिल भिंगारदिवे, डिगू कांबळे, माया कांबळे, युनियनचे उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुनील दळवी, सुनिता जावळे, राधाकिसन कांबळे, सुभाष शिंदे, प्रभावती पाचरणे आदींसह युनियनचे पदाधिकारी, कामगार व महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपोषणात सहभागी होऊन आमदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांशी फोनवर संपर्क करुन करारावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली होती. तर आंदोलनास भाकपचे राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे, कॉ. धोंडीभाऊ सातपुते, आंबेडकरी चळवळीचे अशोक गायकवाड, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, प्रकाश पोटे, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, संदेश कार्ले, दिपक कार्ले, प्रकाश गहिले, राहुल कांबळे, महेश लोंढे, सुजित कोके, नारायण पवार यांनी पाठिंबा दिला होता.
ट्रस्टने नवीन करारानुसार दिलेल्या पगारवाढीचे सर्व कामगारांनी स्वागत केले असून, कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. टोकेकर यांनी विश्वस्तांनी तडजोडीने काढलेल्या मार्गाबद्दल कामगारांच्या वतीने आभार मानले. मेहेरबाबांची प्रार्थना घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. आंदोलनाने कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल व ट्रस्टने सहकार्य केल्याबद्दल पदाधिकारी आणि विश्वस्तांचे आयटकचे राज्य सचिव कॉ. श्याम काळे, राष्ट्रीय सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, जिल्हा सेक्रेटरी बन्सी सातपुते यांनी अभिनंदन केले.