जिल्हाधिकारी यांचे आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पाटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्याला भोवले असून, जिल्हाधिकारी यांनी त्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य छबाबाई महादेव बंडगर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी त्यांना अपात्र ठरवले असून, ग्रामपंचायत मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अशोक देविदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर अनिल भोसले (रा. पाटेवाडी) यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज जिल्हाधीकारी यांच्याकडे दाखल केला होता. छबाबाई महादेव बंडगर या ग्रामपंचायतीच्या 2020-2025 च्या घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मधून सर्वसाधारण महिला या आरक्षित जागेवरून सदस्य पदासाठी निवडून आलेल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत मिळकत नं. 567 चा उतारा मौजे कोरेगाव येथील खाते क्र. 612 चा 7/12 व 8 अ चा उतारा उपविभाग 1066/7 या शेतजमिनी मध्ये पंतप्रधान ग्रामीण आवास योजना या शासकीय सेवेचा लाभ घेऊन त्यामध्ये अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले. तर त्या जागेचा त्यांनी उपभोग घेतला आहे.
ग्रामसेवक ग्रामपंचायत पाटेवाडी यांचा अहवाल पाहता 22 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान आवास योजनेमधून पाटेवाडी येथे त्यांना घरकुल मंजूर झाले. तदनंतर त्यांनी पाटेवाडी येथील मंजूर घरकुलाचे कोरेगांव हद्दीत बांधकाम केले.यामध्ये विद्यमान सदस्य छबाबाई बंडगर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असा अहवाल जिल्हाधीकारी यांच्या समोर सादर केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन बंडगर यांना अपात्र ठरवले आहे. अर्जदार यांच्या वतीने ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. अच्युत भिसे, ॲड. विशाल पांडुळे व ॲड.निखिल चव्हाण यांनी सहकार्य केले.