नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश; भरीव आर्थिक तरतुदीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर
अहमदनगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, नावीन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ करुन महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 1 हजार कोटी झाले आहेत. मंजूर भागभांडवलापैकी सन 2022 आर्थिक वर्षांमध्ये प्रत्येकी वर्षी 100 कोटीप्रमाणे 200 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी शासनाकडून शंभर कोटी निधी प्राप्त झाला असून, 31 मार्च 2024 पर्यंत उर्वरीत शंभर कोटी प्राप्त होणार असल्याची माहिती महांडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
एन.एस.एफ.डी.सी. (राष्ट्रीय अनूसुचित जाती-जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली) या महामंडळाचे 105 कोटी रुपये थकीत असल्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळणे 2015 पासून बंद होते. परंतू सर्व थकिर रकमा भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा 5 लाख, महिला समृद्धी योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार, लघुऋण योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार या तीन योजनेसाठी साडेतीन हजार लाभार्थीसाठी 100 कोटी रुपये निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळात मान्यतेसाठी सादर केलेले आहे. एका महिन्यामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वास महामंडळाने दिलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिले जाणार असून, देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख रुपये उपलब्ध होणार आहेत.
थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजनेसाठी वाढीव आर्थिक तरतुद करण्यात येत असून, त्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 20 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या व्याज परतावा योजना या महामंडळात लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.
लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशी पैकी 19 शिफारशी साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. 450 कोटी इतका निधी मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास सादर केलेला असून, अंधेरी, मुंबई तसेच तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील जागेबाबत सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारणी करिता 50 कोटी निधी मिळणे खरेदीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले आहे.