शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
सावित्री ज्योती महोत्सवाच्या विविध आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आधार मिळणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सव उपक्रमात बचत गटाच्या महिलांना चांगली बाजारपेठ तर सर्वसामान्यांना विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आधार मिळणार आहे. हा समाज उपयोगी उपक्रम असून, महोत्सवात होणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांचा नगरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 11 ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवात नगरकरांसाठी विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची आमदार जगताप यांच्यासह बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, स्वागत अध्यक्ष सुहास सोनवणे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. सुनील तोडकर, रजनीताई ताठे, ॲड. अनिता दिघे, ॲड. प्रणाली चव्हाण, कांचन लद्दे आदी उपस्थित होते.

पुढे जगताप म्हणाले की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. गरजू रुग्णांना मोफत आरोग्य शिबिरातून चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवाला शासन स्तरावरून जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर युवकांनी रक्तदानासाठी पुढे येऊन सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले.
ॲड. महेश शिंदे यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेअंतर्गत रयत प्रतिष्ठान, माहेर फाउंडेशन, जीवन आधार प्रतिष्ठान, आधारवड बहुउद्देशीय संस्था, समर्पण बहुद्देशीय संस्था, नर्मदा फाउंडेशन आदींच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगट, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्ताच्या विविध तपासण्या, स्त्री आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, निसर्गोपचार, आयुर्वेदिक उपचार पद्धती, रक्तदान शिबिर, बाल आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत केले जाणार असल्याची माहिती दिली.
रक्तदान शिबिर अहमदनगर जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, आनंदऋषी हॉस्पिटल, बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी आदींच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे. या शिबिरासाठी डॉ. बी.आर. रणनवरे, डॉ. धनाजी बनसोडे, डॉ. प्रमोद पालवे, डॉ. कल्पना रणनवरे, डॉ. शंकर शेडाळे, डॉ. अनिल बोरगे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. संजीव गडगे, डॉ. प्रशांत महांडुळे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. किशोर पाथरकर, शिवाजी जाधव, संतोष काळे, आरती शिंदे, जालिंदर बोरुडे, गणेश बनकर, दिनेश शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.